फोटो सौैजन्य - Social Media
देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांपैकी एक असलेली भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली आता केवळ बीटेक किंवा एमटेकपुरती मर्यादित राहिलेली नाही. नव्या शैक्षणिक वर्षात संस्थेने पारंपरिक अभ्यासक्रमांच्या चौकटीबाहेर जाऊन ५ नव्या कोर्सेसची घोषणा केली आहे. हे अभ्यासक्रम उद्योगजगतातील गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून, त्यामध्ये तीन सर्टिफिकेट कोर्सेसचाही समावेश आहे.
बीटेक इन डिझाईन: तांत्रिकतेसह सर्जनशीलतेची जोड
IIT दिल्लीने सर्वप्रथम ‘बीटेक इन डिझाईन’ हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा कोर्स क्रिएटिव्ह डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम आहे. डिझाईन डिपार्टमेंटमार्फत चालवल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी JEE Advanced स्कोअरबरोबरच UCEED चा स्कोअर देखील आवश्यक आहे. १२वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असलेले विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र ठरतात. डिझाईन क्षेत्रातील करिअरसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
बीएस इन केमिस्ट्री: संशोधन आणि फार्मास्युटिकल क्षेत्रासाठी नवे दालन
दुसरा महत्त्वाचा अभ्यासक्रम म्हणजे ‘बीएस इन केमिस्ट्री’. हा चार वर्षांचा कोर्स IIT दिल्लीच्या केमिस्ट्री विभागाद्वारे चालवला जाणार आहे. यासाठी देखील JEE Advanced स्कोअर आवश्यक आहे. जे विद्यार्थी संशोधन, औषधनिर्माण, केमिकल उद्योग यामध्ये करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरेल.
तीन सर्टिफिकेट कोर्सेस: व्यावसायिकांसाठी खास डिझाइन
तांत्रिक पदव्या असलेल्या किंवा मध्यम पातळीवरील प्रोफेशनल्ससाठी IIT दिल्लीने तीन सर्टिफिकेट कोर्सेस देखील सादर केले आहेत.
सप्लाय चेन मॅनेजमेंट
सहा महिन्यांचा हा कोर्स ग्रॅज्युएट्स आणि मिड-लेव्हल मॅनेजमेंट प्रोफेशनल्ससाठी उपयुक्त आहे. यामध्ये लॉजिस्टिक्स, साठवणूक, पुरवठा नियंत्रण यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. फी सुमारे ₹1.5 लाख आहे.
फायनान्स फॉर नॉन-फायनान्स प्रोफेशनल्स
आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या लोकांसाठी बनवलेला हा सहा महिन्यांचा कोर्स आहे. यामध्ये मूलभूत फायनान्शियल प्लॅनिंग, बजेटिंग, बिझनेस मॉडेल्स याचे प्रशिक्षण दिले जाते.
सेमीकंडक्टर टेक्नोलॉजी अँड मॅन्युफॅक्चरिंग
इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग किंवा सायन्स ग्रॅज्युएट्ससाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरतो. भारतातील सेमीकंडक्टर उद्योग झपाट्याने वाढतोय, त्यामध्ये कौशल्य मिळवण्यासाठी हा कोर्स उत्तम संधी देतो.
IIT दिल्लीच्या या पुढाकारामुळे भारतीय शिक्षणपद्धती अधिक व्यावसायिक, तंत्रज्ञानाधारित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होत चालली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, अर्थशास्त्र आणि उत्पादन क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करण्याची संधी आता मिळणार आहे. यामुळे केवळ विद्यार्थ्यांना नव्या करिअरच्या वाटा खुल्या होतीलच, पण देशातही नव्या कौशल्यांच्या माध्यमातून अधिक सक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल.