फोटो सौजन्य - Social Media
संघ लोक सेवा आयोग (UPSC) मार्फत ग्रुप A आणि B मधील विविध तांत्रिक व वैज्ञानिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना 12 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. एकूण 24 रिक्त पदे या भरतीद्वारे भरली जाणार असून, त्यामध्ये बॉटेनिस्ट, असिस्टंट ड्रग कंट्रोलर (मेडिकल डिवाइसेस) आणि ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर ही प्रमुख पदे समाविष्ट आहेत. ही सर्व पदे पर्यावरण, आरोग्य आणि औषध नियंत्रणाशी संबंधित मंत्रालयांच्या अंतर्गत येतात आणि यांची नियुक्ती देशभर कुठेही केली जाऊ शकते.
या पदांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. बॉटेनिस्ट पदासाठी उमेदवारांकडे वनस्पतीशास्त्र, बागवानी, जीवशास्त्र किंवा कृषी विषयात M.Sc. पदवी असणे आवश्यक आहे. असिस्टंट ड्रग कंट्रोलर पदासाठी रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, फार्मसी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे. तर सायंटिफिक ऑफिसर पदासाठी संबंधित अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय, जीवनशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
वयोमर्यादाही पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. बॉटेनिस्ट आणि ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे, तर असिस्टंट ड्रग कंट्रोलरसाठी 50 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयात सूट देण्यात येणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी वैध ओळखपत्र, 10वी व 12वीच्या मार्कशीट्स, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र (जर असेल तर), पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र आणि PwBD प्रमाणपत्राची तयारी ठेवावी. अर्ज शुल्क UR/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹25 असून, SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे. शुल्क ऑनलाईन किंवा ई-चालानद्वारे देता येईल.
ही भरती केवळ मुलाखतीद्वारे होणार आहे. परंतु, अर्जांची संख्या जास्त असल्यास आधी भरती परीक्षा (RT) घेतली जाईल. त्यानंतर मुलाखत होईल आणि अंतिम निवड ही दोन्ही टप्प्यांच्या गुणांच्या आधारे करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://upsconline.gov.in ला भेट द्यावी आणि नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.