ठाणे/ स्नेहा काकडे : जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम, २००९ नुसार, यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. शाळेपासून १–३ किमी अंतरात राहणाऱ्या विद्यार्थांना आणि ज्यां कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा कमी आहे अशी मुलं किंवा जे अनाथ आहेत असे अशा मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षणाची तरतूद करण्यात येते. सध्या या RTE प्रवेश प्रक्रीयेची तिसऱ्या टप्यातील प्रवेश फेरी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. २८ एप्रिल, २०२५ रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक ३ मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दि. २८ एप्रिल २०२५ ते दि. ७ मे २०२५ या कालावधीत पूर्ण करायची आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती SMS द्वारे पाठवली जात आहे. मात्र पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती नियमितरित्या तपासावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन दस्तऐवजांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी दि. ७ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागेल.ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ६२७ पात्र शाळांमध्ये ११,३२० रिक्त जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत ८,३५८ प्रवेश पूर्ण झाले आहेत.
प्रतीक्षा यादी टप्पा ३ अंतर्गत उर्वरित रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.आरटीई प्रक्रियेबाबतची अधिकृत माहिती https://student.maharashtra.gov.in/adm_portal/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ६२७शाळेतून ११ हजार ३२२ जागांवर आरटीई शिक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारी पासून सुरु झाली असून ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज गेले होते. यातून पहिल्या प्रवेश प्रक्रीयेदरम्यान १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.