
फोटो सौजन्य - Social Media
नक्की कोणत्या मागण्यांसाठी उभारण्यात येणार शिक्षकांचे हे आंदोलन?
मुंबई महानगरपालिकेतील निम्म्या मराठी शाळा तर बंदच झाल्या आहेत तर त्यातल्या काही शाळांना इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्यात आले आहे. अगदी मुंबईत मराठी शाळांसाठी गैरप्रकार घडत आहेत. शिवडीमध्ये तर चक्क शाळाच चोरीला गेली आहे. एखादी मराठी शाळा पाडून त्या ठिकाणी मोठा टॉवर बांधण्यात आला आहे. शाळांचा पट २५० पण इतक्या पटासाठी फक्त ३ वर्ग उपल्बध करून देण्यात आले आहे. माहीमच्या मोरी रोड येथे मराठी शाळा पडून ४ वर्षे उलटली पण अद्याप त्याठिकाणी नवीन शाळा उभारण्यात आली नाही. न्यू माहीम स्कुलची डागडुजी तर झालीये पण तिला मुद्दामून पडीक असल्याचे ठरवले जात आहे, जेणेकरून त्या ठिकाणी इतर वास्तूंची निर्मिती करण्यात येईल किंवा बिल्डरच्या घशात घालता येईल. कुलाब्यात विद्यार्थ्यांचे स्थलांतर अशा ठिकाणी करण्यात आले, जिथे सुविधांचा अभाव आहे. नीट पाणी, स्वछतागृहे तसेच जागा नाही. लोअर परळमध्ये तर हद्दच झाली आहे, येथे चक्क इमारतीच्या पार्किंगमध्ये वर्गखोल्या घेतले जात आहेत. मानखुर्द, गोवंडी, चेबूर परिसरात मराठी माध्यमिक शाळांचा अभाव आहे. भांडूप खिंडीपाडा येथील शाळेचे स्थलांतर, पण दोन वर्षांनंतरही नूतनीकरण नाही. या सर्व प्रकरणांमुळे विद्याथ्यांची गळती होत आहे आणि ते खासगी शाळांकडे वळत आहेत. हे सगळे आरोप शिक्षकांकडून करण्यात आले आहे.
शिक्षकांनी गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आन्दोलनात मुंबईतील सर्व मराठी नागरिकांना आपल्या भाषेसाठी एकत्र येण्याचे आणि अस्तित्वासाठी लढा देण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रकारवार निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलन भविष्यात आणखीन तीव्र होईल असे संकेत शिक्षकांनी दिले आहेत.