
फोटो सौजन्य - Social Media
ठाणे येथील जोशी–बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात आयोजित डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या 48 व्या पुष्पात युवा सामाजिक कार्यकर्ते व गडचिरोली येथील सर्च फाउंडेशनच्या ‘निर्माण’ प्रकल्पाचे संचालक अमृत बंग यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. बुधवार, 21 जानेवारी 2026 रोजी “राष्ट्र परिवर्तन : युवकांसाठी युवकांकडून” या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.
या व्याख्यानात अमृत बंग यांनी गडचिरोलीतील सर्च फाउंडेशनच्या ‘निर्माण’ प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या मासिक शिबिरांमधून ग्रामीण, आदिवासी व वंचित भागातील तरुण घडवले जातात. या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, नेतृत्वगुण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. अनेक विद्यार्थी या शिबिरांनंतर समाजसेवा, आरोग्य, शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात सक्रियपणे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजचा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात पैसा, प्रतिष्ठा आणि चांगल्या पॅकेजच्या मागे धावत असल्याचे निरीक्षण मांडताना अमृत बंग म्हणाले की, केवळ आर्थिक यशालाच जीवनाचे अंतिम ध्येय मानू नये. युवकांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, स्वतःच्या पायावर उभे राहत आयुष्याचे स्पष्ट ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. ध्येय निश्चित केल्यास वाटचाल योग्य दिशेने होते आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
समाजासाठी काहीतरी भरीव योगदान देणे ही प्रत्येक तरुणाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. “फक्त चांगले पॅकेज मिळवणे हेच आयुष्याचे ध्येय नसावे, तर आपल्याकडून समाजासाठी, इतरांसाठी चांगले कार्य घडले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. युवकांच्या सहभागातूनच राष्ट्रपरिवर्तन शक्य असून त्यासाठी संवेदनशील, जागरूक आणि कृतीशील तरुणांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक यांनी सर्च फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. अमृत बंग यांनी मांडलेल्या सूचनांचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘निर्माण’ प्रकल्पाच्या शिबिरात आवर्जून सहभागी करून घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मानसी जंगम यांनी केले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर व सदस्य डॉ. महेश बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.