फोटो सौजन्य - Social Media
टेक कंपन्यांनी खर्च कपातीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली असून, यंदाच्या वर्षात आतापर्यंत २३,१५४ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. उत्पन्न घटल्यामुळे कंपन्यांना खर्चात कपात करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली असून, २०२३ मध्ये २,६४,२२ कर्मचाऱ्यांना आणि २०२२ ते २०२४ या काळात तब्बल ५,८१,९६१ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.
कर्मचारी कपातीवर नजर ठेवणाऱ्या ‘लेऑफ्स डॉट एफवायआय’ या संस्थेच्या अहवालानुसार, ६ जानेवारी २०२४ पासून ही कपात सुरू झाली. सुरुवातीला इस्रायलमधील सोलरएज कंपनीने ४०० कर्मचाऱ्यांना कमी केले. भारतातही कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणावर होत असून, ओला इलेक्ट्रिकने १,००० कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले आहे. मेटाने यंदा आतापर्यंत सर्वाधिक ३,६०० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस मॉर्गन स्टॅन्ली कंपनी २,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी खर्च कपात करण्याबरोबरच एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि ऑटोमेशनवर अधिक भर देत आहे. अमेझॉननेदेखील यंदाच्या सुरुवातीला १४,००० व्यवस्थापकांना नोकरीवरून कमी करण्याची घोषणा केली आहे. या कपातीमुळे कंपनीला दरवर्षी २.१ अब्ज डॉलर ते ३.६ अब्ज डॉलरची बचत होईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कर्मचाऱ्यांवर अधिक कार्यक्षमतेचा दबाव वाढला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, कामगिरी समाधानकारक नसल्यास कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात येईल. अनेक कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहेत. एआय आणि ऑटोमेशनमुळे भविष्यात अनेक पारंपरिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार असून, कर्मचारी कपात ही नवीन व्यावसायिक धोरणाचा भाग बनत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करण्यावर भर देणे गरजेचे आहे.