फोटो सौजन्य - Social Media
वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. हा निर्णय २० मार्च २०२५ पासून लागू होणार असून, उन्हाळी सुटी लागेपर्यंत म्हणजेच १ मेपर्यंत शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत चालतील. या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी जारी केले आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सोई लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ३,५०० आणि इतर व्यवस्थापनांच्या १,५०० अशा एकूण ५,००० शाळा आहेत. या सर्व शाळांना नवीन वेळापत्रकाचे पालन करणे बंधनकारक असेल. मार्च महिन्यात तापमानात मोठी वाढ होते, त्यामुळे दरवर्षी शाळांच्या वेळेत बदल केला जातो. सध्या शाळा सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ या वेळेत भरतात. परंतु उन्हाळ्यात वाढणारे तापमान, पाण्याची कमतरता आणि उष्णतेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी सकाळी शाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. तसेच, अनेक शाळा पत्र्याच्या इमारतींमध्ये भरत असल्याने दुपारच्या वेळेस उकाडा वाढतो. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि पालकांकडून शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात ठेवण्याची मागणी होत होती. यामुळेच गुरुवारपासून (२० मार्च) जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत सुरू राहणार आहेत. हा बदल सुमारे ४० दिवस म्हणजे उन्हाळी सुटीपर्यंत कायम असेल.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर पहिली १० मिनिटे परिपाठासाठी ठेवली जातील, त्यानंतर आठ तासिका पूर्ण केल्या जातील. तसेच, मधली सुटी सकाळी ९:३५ ते १०:१० अशी ३५ मिनिटांची असेल. या बदलामुळे विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा त्रास कमी होईल आणि शिक्षण प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.