फोटो सौजन्य - Social Media
शैक्षणिक यशासोबतच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत, पीटीव्हीए साठये कॉलेज (स्वायत्त) मुंबईतर्फे एक विशेष मानसिक आरोग्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून, त्यांना शैक्षणिक तणाव आणि नव्या शैक्षणिक रचनेत समायोजन करण्यास मदत करणे हा होता.
ही कार्यशाळा मंगळवारी कॉलेजच्या समुपदेशन कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली. यामध्ये सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यासाठी या सत्रात दोन प्रमुख तज्ज्ञ उपस्थित होते. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रेयसी तेंडोलकर-आव्हाड आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हेम मेहता.
सत्रादरम्यान तज्ज्ञांनी “मेंटल हेल्थ इज नॉट अ लक्झरी, इट्स अ नीड” या संकल्पनेवर भर देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी तणाव, अस्वस्थता, शैक्षणिक अपेक्षा, अपयश आणि ‘बर्नआउट’ यासारख्या मानसिक आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. वेळेचं व्यवस्थापन, विश्रांतीचे महत्त्व, आणि आपल्या भावनांना योग्य व्यासपीठावर व्यक्त करण्याची गरज यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.
या सत्रातील खास आकर्षण म्हणजे “ग्रिट स्केल” या उपक्रमात्मक कृतीची अंमलबजावणी होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मानसिक ताकदीचा (resilience) अनुभव घेतला आणि आत्ममूल्यांकन केलं. त्यातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या मानसिक आरोग्याच्या पातळीची जाणीव झाली, जे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरले. कार्यशाळेच्या अखेरीस विद्यार्थ्यांना एक चिंतनात्मक गृहपाठ देण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्यास पूरक सवयी कशा रुजवाव्यात याबाबत विचारमंथन करावं, असा उद्देश होता.
या यशस्वी उपक्रमानंतर कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी सांगितले की, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे अनेक विद्यार्थी गोंधळलेले आणि तणावाखाली आहेत. त्यामुळे अशा कार्यशाळांची आवश्यकता अधिकच आहे.” साठये कॉलेजने केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर भावनिक समतोल आणि मानसिक आरोग्याला समान महत्त्व दिल्याने, हे कॉलेज एक जबाबदार आणि विद्यार्थी-केंद्रित संस्था म्हणून उभी राहिली आहे.