सोन्याची चकाकी ठरली खोटी; बनावट दागिने देऊन 10 लाखांची फसवणूक
बार्शी : माझी पत्नी आजारी असून माझ्याकडे जुने सोने आहे, असे सांगून दोघांनी मिळून दोन किलो बनावट सोने देऊन एकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. गुरुवार (दि. ९) रोजी सव्वा बारा वाजता बार्शीतील शुभाष नगर भागात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बिट्टू (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य एक अनोळखी महिला अशा दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल जैन (वय ३८, रा. अनंत निवास, स्वामी समर्थ मंदीराजवळ, पंकज नगर बार्शी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जैन यांचे हिरामेठ हॉस्पिटल येथे हार्डवेअरचे दुकान असून ७ जानेवारीला एक अनोळखी पुरुष बिट्टू (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) व एक अनोळखी महिला दुकानात बकेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी बकेट घेतल्यावर त्यांच्या वडीलांना म्हणाला होता की, माझी पत्नी आजारी आहे तिला दवाखान्यात दाखवायचे आहे, तिच्या उपचारासाठी मला पैशाची गरज आहे, माझ्याकडे जुने सापडलेले सोने आहे ते मला विकायचे आहे. कुणी घेणार असेल तर, मला कळवा असे म्हणत त्याने त्यांचा मोबाईल नंबर दिला व त्याने वडीलांजवळ १ सोन्याचा मणी दिला व तो निघून गेला होता.
दरम्यान त्यानंतर सोन्याचा मनी फिर्यादीने सोनाराकडे चेक केला असता तो मणी सोन्याचाच होता. त्यानंतर ९ जानेवारी रोजी दुपारी ते दुकानामध्ये काम करीत असताना दुकानात मागील वेळी सोन्याचा मणी दिलेले तेच एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला दुकानात आले तेंव्हा त्याने आणखी २ सोन्याचे मणी दिले. त्यानंतर ते मणी चेक करण्यासाठी दिले. त्यांनी ते सोनारकडे चेक केले असता ते मणी सोन्याचेच होते. नंतर फसवणूक केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शोध घेतला असता फोन बंद
सुरुवातीला दिलेले मणी साेन्याचे असल्याची खात्री झाल्याने आम्ही त्या एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिलाकडून माझ्या जवळील दहा लाख रुपये रोख रक्कम देऊन त्यांच्याकडील २ किलो वजनाचे सोन्याच्या मण्याच्या माळा घेतल्या व ते दोघेही तेथून निघून गेले. दिलेले सोने चेक केले असता ते सोने बनावट असल्याची खात्री झाली. बनावट सोने देणाऱ्या दोघांचा शोध घेतला असता तो फोन बंद लागला. अनोळखी पुरुष व अनोळखी महिला यांनी १० लाखांची फसवणूक केल्याचे लक्षात आले, असे फिर्यादित म्हटले आहे.