पिंपरी : तुमच्या नावाने मुंबई येथून इराण येथे पार्सल जात असून त्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, असे सांगून महिलेची 24 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून अटक केली. स्वरूप अशोक खांबेकर (42, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), पुष्कर चंद्रकांत पाखले (रा. जळगाव), मोनीक भरतभाई रंगोलीया (रा. सुरत), कौशिक मनसुखभाई बोरड (रा. सुरत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बाणेर येथील 38 वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाइल क्रमांक धारकाने फिर्यादी महिलेला फोन केला. तो फेडेक्स कुरीअर कंपनी, मुंबई अंधेरी येथून कंपनीचा हेड रिप्रेझेन्टीव्ह बोलत असल्याचे त्याने भासवले. तुमचे मुंबई ते इराण असे कुरिअर जात आहे. त्या औषधाच्या कुरिअरमध्ये एका औषधामध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत तुमचा कॉल नार्कोटिक्स विभागाला ट्रान्सफर करतो असे म्हणत आरोपीने कॉल दुसऱ्या आरोपीला जोडला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने ते पार्सल कस्टमवाल्यांनी अटकवून ठेवले असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी तुम्हाला मुंबई येथे येऊन ते तुमचे पार्सल नाही हे क्लियर करावे लागेल किंवा ऑनलाइन स्काइप ॲपवरून बोलून क्लियर करावे लागेल, असे सांगितले.
त्यानंतर स्काइप ॲपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेच्या मोबाइलच्या स्क्रिनचा ॲक्सेस मिळवला. महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून 24 लाख 99 हजार 998 रुपये बँक खात्यावर घेतले. याबाबत हिंजवडी पोलीस तपास करीत होते. याच गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून केला जात होता.
सायबर पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्याद्वारे आरोपीची ओळख पटवून त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करत त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती घेऊन त्यांनाही जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतले. आरोपींनी वापरलेल्या एसबीआय बँकेच्या खात्यावर दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्या खात्याबाबत भारतातून 68 तक्रारी आलेल्या आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे यांनी केली.