
खोट्या जाहीरीतीमुळे ८ लाख रुपयांचा गंडा; जुन्या नोटांच्या बदल्यात मोठ्या रक्कमेचे अमिष दाखवून फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्या मोबाईलवर ८००३२१६७६२ या क्रमांकावरून ‘ओल्ड कॉइन कंपनी’च्या नावाने जाहिरात आली होती. जाहिरातीमध्ये शेवटी ‘७८६’ क्रमांक असलेल्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार पाटील यांनी त्यांच्याकडील २००, १०० आणि १० रुपयांच्या, शेवटी ७८६ क्रमांक असलेल्या तीन नोटांचे फोटो संबंधित मोबाईल क्रमांकावर पाठवले. त्यानंतर ८९४९१०९७६९ या क्रमांकावरून पाटील यांना फोन आला. समोरच्या व्यक्तीने ‘ओल्ड कॉइन कंपनी’तून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या नोटांच्या बदल्यात ५७ लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विविध कारणे सांगून पाटील यांच्याकडून वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले.
१६ जुलै ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मोबाइल स्कॅनरच्या माध्यमातून पाटील यांनी वेगवेगळ्या वेळी एकूण ८ लाख १ हजार ५०० रुपये पाठवले. मात्र, पैसे भरल्यानंतरही त्यांना सांगितलेली ५७ लाखांची रक्कम मिळाली नाही. उलट आणखी पैसे भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. पैसे न दिल्यास इजा करण्याची धमकीही देण्यात आल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.या प्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मिटकरी पुढील तपास करीत आहेत.
ग्रामीण भागातही सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, वृद्ध व्यक्तींना लक्ष्य केले जात असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आरळा येथील ७७ वर्षीय सुरेश गोविंद पटवर्धन यांची सोलर प्रकल्पाच्या नावाखाली तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यानंतर बिळाशी येथेही अशाच प्रकारची घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.