पुण्यात मोठा अपघात, महिला पोलिसाला कारने उडवले अन्...
पुणे : ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदीकरून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली असून, आरोपी पसार झाले आहेत.
सायंकाळपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रात्री पावणे दोनच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपमाला नायर या बंडगार्डन वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. वाहतूक विभागाकडून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अचानक मध्यरात्री ड्रंक अँड ड्राईव्ह ही विशेष मोहिम राबवत आहे. त्यामुळे बंडगार्डन वाहतूक विभाग आरटीओ ऑफिसजवळील नायडू लेन याठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्याठिकाणी नायर व त्यांचे सहकारी तसेच वरिष्ठ अधिकारी वाहनांची तपासणी करून मद्य पिऊन वाहने चालविली जात आहेत का, याची तपासणी करत होत्या. तेव्हा कोरेगांव पार्क किंवा येरवडा भागाकडून एका आलिशान भरधाव कार आली. चालकाने ती न थांबवती, तशीच पुढे दामटली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठाला अटक करण्याची भिती दाखवली अन्…
बॅरिकेट टाकून नाकाबंदी सुरू असतानाही तो तशाच भरधाव निघाला. तेव्हा एका बॅरिकेटला त्याने उडविले. त्यापुर्वी एका कारला देखील त्याने धडक दिली. नंतर कारने नायर यांना जोराची धडक दिली. त्यानंतर तो तेथून वेगाने पसार झाला. अपघातानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग केला, पण कार निघून गेली. तर नायर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्या गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहायक आयुक्त दिपक निकम, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुणे पोलीस ‘अॅक्शन मोडवर’
बेशिस्त वाहन चालकांमुळे देखील या वाहतूक कोंडीत भर पडते. तर अपघाताला देखील निमत्रंण मिळते. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ट्रिपलशिट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणारे तसेच मोबाईल टॉकिंग अशांवर जोरदार कारवाई सुरू केली. वाहने देखील जप्त करण्यात येत होती. नंतर आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आता थेट पोलिसांनी बेशिस्तांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांसह रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे, असे दाखल गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यावर दिसून येते.