मुलीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला
नागपूर : मुलीपासून दूर राहा असे वारंवार बजावूनही ऐकत नसल्यामुळे चिडलेल्या बापाने तरुणावर चाकूने हल्ला केला. मान, खांदा आणि पाठीवर मारून रक्तबंबाळ केले. ही खळबळजनक घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. चैतन्य उर्फ चेतन सूर्यकांत हिवरकर (वय २८, रा. वाठोडा) असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री चैतन्य हा मित्रांसोबत एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिऊन झाल्यानंतर सर्वजण त्याच्या चारचाकी (एमएच-१२/ईजी-७९७६) वाहनामध्ये बसून जात होते. प्रधानमंत्री आवास योजनाकडे जाणाऱ्या मार्गावर लघुशंका करण्यासाठी त्याने वाहन थांबवले. सर्व मित्र लघुशंकेला जाण्यासाठी वाहनामधून उतरले. मात्र, चैतन्य गाडीतच बसून राहिला.
हेदेखील वाचा : Pune Crime: मैत्रीणीसाठी रागाच्या भरात कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
या दरम्यान तोंडाला रूमाल बांधून असलेला आरोपी मुकेश दुचाकीने तेथे आला. शिवीगाळ करत चैतन्यवर चाकूने हल्ला केला. मान, खांदा व पाठीवर वार करून रक्तबंबाळ केले आणि पळून गेला. या घटनेने खळबळ उडाली. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
पुण्यातही एकावर करण्यात आला हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. मैत्रिणीसाठी शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे आहे. तर आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. या परिसरात अशा अनेक घटना घडताना दिसत आहे.