पार्किंगमध्ये लघुशंका केल्याने झाला वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच मोबाईल न दिल्याने मारहाण करून एकास जखमी करण्यात आल्याची घटना समोर आली. ही घटना वायगाव (नि.) येथे बुधवारी (दि. 18) घडली. अमोल विठ्ठल राऊत (रा. कुरझडी) असे जखमीचे नाव आहे.
अमोल व त्याचे मित्र हे दोघे मित्राच्या बहिणीकडे कानगाव येथे गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान वायगाव (नि.) येथे त्यांना कुरझडी येथील रहिवासी संदीप कुरसंगे भेटला. त्याने मोबाईलची मागणी केली. अमोल याने मोबाईल देण्यास नकार दिला. याच नकाराचा राग आरोपी संदीपला प्रचंड आला. त्यानंतर संदीपने अमोल यास बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी संदीप कुरसंगे याच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, सध्या किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच आता फक्त मोबाईल दिला नाही म्हणून बेदम मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा एकदा वाढती गुन्हेगारी हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
प्रेयसीसोबत पती दिसताच महिला संतप्त
दुसऱ्या एका घटनेत, महिलेने आपल्या पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडले. प्रेयसीच्या सालोड हिरापूर येथील घरी पकडण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्ता महिलेस तिच्याच पतीच्या प्रेयसीने केस पकडून मारहाण करत जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सालोड हिरापूर येथे घडली.
मारहाणप्रकरणी गुन्हा केला दाखल
वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना महाकाळ येथे मंगळवारी (दि. 17) घडली. या प्रकरणी शीतल नेहारे (रा. महाकाळ) यांच्या तक्रारीवरून महाकाळ येथील रहिवासी कुणाल चव्हाण व रामा उर्फ दीपक मेश्राम यांच्याविरुद्ध सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.