
कात्रज घाटात भिषण अपघात; टेम्पोची दुचाकीला धडक बसली अन्...
पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागात दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज घाट परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विक्रम विठ्ठल मोरे (वय ४८, रा. सुमती बालवन शाळेजवळ, गुजरवाडी, कात्रज) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अपघातात सहप्रवासी स्वप्नील लोहकरे (वय ३१) जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेम्पोचालक सुमीत शेनवेकर (वय ३५, रा. महागाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोरे यांचा मुलगा रोहित (वय २२) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हे सुद्धा वाचा : चोरट्यांची पण कमालच! माती उकरून थेट कंपनीमध्ये केला प्रवेश
दुचाकीस्वार विक्रम आणि स्वप्नील शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास कात्रज घाटातील भिलारेवाडी परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार विक्रम व स्वप्नील जखमी झाले. विक्रम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख अधिक तपास करत आहेत.
अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान पुण्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसाखाली दोन वेगवेळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. भरधाव दुचाकींच्या घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका १७ वर्षीय मुलासह दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अलंकार व डेक्कन परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अलंकार परिसरातील डीपी रोडवर भरधाव बुलेट डिव्हायडरला धडकून अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने बुलेटने ८६ वर्षीय पादचारी आणि एक तरुण जखमी झाला. तर, यश कमलेश दहिवळ (वय १७, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) याचा मृत्यू झाला आहे. अपघातात पादचारी श्रीकांत दत्तात्रय दातार (वय ८६, रा. अलंकार सोसायटी, कर्वेनगर), जयराज राजेश हुलगे (वय १८, रा. आनंदविहार सोसायटी, सिंहगड रस्ता) जखमी झाले. याबाबत हवालदार रामदास गोरे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, यश एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. एरंडवणे भागातून गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास तो बुलेटवरून घरी निघाला होता. भरतकुंज सोसायटी परिसरात अप्पासाहेब कुलकर्णी पथ रोडने जाताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव बुलेट डिव्हायडरला धडक दिली. यात यशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच पादचारी दातार, हुलगे यांना बुलेटने धडक दिली. तिघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तो मरण पावला.