
Sindudhurgh Accident news: सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारीसाठी गेलेल्या नौकेला जलसमाधी; भाजप उपाध्यक्षासह दोघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणच्या दांडी भागातील रहिवासी सन्मेश परब हे नेहमी प्रमाणे आपला मुलगा सुयोग आणि खलाशी अक्षय राणे यांच्यासोबत सागरिका नौकेतून मासे-मारीसाठी समुद्रात गेले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पोहोचल्यानंतर नौका अचानक बुडू लागली. प्राथमिक माहितीनुसार, नौका खडकावर आदळल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वडिलांना वाचवण्याचा केला प्रयत्न
नौका बुडू लागल्यानंतर तिघांनीही समुद्रात उडी घेत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. सुयोगने आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्रातील लाटांचा जोर अधिक असल्याने सन्मेश परब आणि अक्षय राणे यांना सावरणे शक्य झाले नाही. दोघेही समुद्रात बुडाले. या घटनेमुळे सुयोगवर मोठा मानसिक आघात झाला आहे.
मच्छीमारांनी वाचवले सुयोगला
अपघाताची माहिती मिळताच जवळच मासेमारी करणारे मच्छीमार मदतीसाठी धावले. जयदेव लोणे यांच्या नौकेने तातडीने घटनास्थळी पोहोचून सुयोगला समुद्रातून बाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, सन्मेश परब आणि अक्षय राणे यांना वाचवण्यात यश आले नाही. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने दोघांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
दांडी परिसरावर शोककळा
या दुर्घटनेची माहिती परिसरात पसरताच दांडीसह संपूर्ण मालवणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. भाजपचे मालवण तालुका उपाध्यक्ष असलेल्या सन्मेश परब यांच्या निधनामुळे स्थानिक राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन अक्षय राणे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.
शवविच्छेदनासाठी पाठवले मृतदेह
स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. नौका नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. नौका खडकावर आदळली का, समुद्रातील लाटांचा जोर कारणीभूत ठरला का, यासह अन्य बाबी तपासल्या जात आहेत. या घटनेबाबत अधिकृत तपासातून दुर्घटनेचे नेमके कारण अजून स्पष्ट होणार आहे.