
उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे! (Photo Credit - X)
उल्हासनगरमध्ये सायबर ठग पुन्हा सक्रिय झाले असून, उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३, सी ब्लॉक परिसरात राहणारे इंदर खानचंदानी (वय ६८) हे सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. त्यांना ‘शेअर बाजारातून जास्त परतावा मिळेल’ या बहाण्याने फसवण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये जोडून विश्वास संपादन
इंदर खानचंदानी सोशल मीडिया ॲपवर ब्राउझिंग करत असताना, त्यांना एका तथाकथित ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची जाहिरात दिसली. ‘कमी गुंतवणुकीत जास्त परतावा’ असे आश्वासन देत त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये ठगांनी रोजच्या ‘कमाईचे स्क्रीनशॉट’, ‘मार्गदर्शन’ आणि ‘प्रिमियम सिग्नल’ यांचा वापर करून खानचंदानी यांचा विश्वास संपादन केला.
२८ लाख ५ हजार ट्रान्सफर
विश्वास बसल्यानंतर २१ जुलै २०२५ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत खानचंदानी यांना विविध बँक खात्यांमध्ये हप्त्यांमध्ये २८,०५,००० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले.
सुरुवातीला ‘गुंतवणूक वाढली आहे’, ‘तुमचा नफा तयार आहे’ असे सांगण्यात आले, मात्र जेव्हा खानचंदानी यांनी पैसे परत मागितले, तेव्हा संबंधितांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांची वेबसाईटही अचानक बंद पडल्याने त्यांना फसवणुकीचा स्पष्ट अंदाज आला.
यानंतर त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
टीप: सायबर पोलिसांनी नागरिकांना सतत इशारा दिला असतानाही उच्च परताव्याचे आमिष दाखवून होणाऱ्या ठगीचे प्रमाण वाढत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.