
५ सुवर्ण,६ रौप्य पदकांची मानकरी... अश्विनीने तीन मुलांसह उचलले टोकाचे पाऊल; अश्विनी पौळ यांच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्र हादरले
कोण होत्या अश्विनी पौळ?
अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे नाव आहे. विवाहापूर्वी त्या अश्विनी मोहिते म्हणून ओळखल्या जात होत्या. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या त्या रहिवासी असून त्यांनी कुस्ती क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या आक्रमक खेळामुळे त्यांची ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख निर्माण झाली होती. अश्विनी यांना कुस्तीचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले. त्यांच्या वडिलांनी मुलीच्या सरावासाठी घरातच कुस्तीची तालीम सुरू केली होती. त्यानंतर मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले. तसेच २००७ मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अश्विनी यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २००८ आणि २००९ मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कामगिरी केली. त्यांच्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीत त्यांनी पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके मिळवून महाराष्ट्राचा गौरव वाढवला.
वडिलांचा सासरच्यांवर गंभीर आरोप
अश्विनी यांच्या वडिलांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळूनच अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, पोलिसांकडून त्याबाबत चौकशी सुरू आहे. या घटनेत अडीच वर्षांची वीरा ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा
अश्विनी पौळ मुंबईतील ‘एमएसएफ’ मध्ये नोकरी करत होत्या. त्यांचे पती मनोहर पौळ हे रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. पतीच्या सांगण्यावरून अश्विनी यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. तसेच नळदुर्ग किल्ल्यावर नेमके काय घडले, अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले आणि त्यामागे कौटुंबिक कारणे होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. कुटुंबीयांचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि अन्य परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे या प्रकरणाचा तपास पुढे नेला जात आहे.