६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बदलापूर पुन्हा हादरलं (फोटो सौजन्य-X)
Badlapur crime News Marathi: गेल्य वर्षी बदलापुरातील शाळेत चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संतापजनक घटनेने संपूर्ण बदलापुरासह राज्यातून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. शाळेतच काम करणाऱ्या अक्षय शिंदेने हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला जात असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. असे असताना आज पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ६ वर्षांच्या चिमूरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं पुढं आलं आहे. आरोपीने या मुलीला अंधाऱ्या निर्जनस्थळी नेलं व तिच्यावर अत्याचार केले. आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंजाड गावात १४ जानेवारीच्या रात्री हा प्रकार घडला. या गावात राहणारा हा १६ वर्षांचा तरुण ६ वर्षांच्या मुलीसोबत खेळण्याच्या बहाण्याने शेजारी बस स्टॉपजवळील एका निर्जन ठिकाणी गेला आणि तिथे अश्लील कृत्ये करू लागला. यावेळी मुलगी रडू लागल्याने त्याने तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं.
दुसऱ्या दिवशी मुलगी अतिशय घाबरलेली होती. चिमुकली शाळेत जायला तयार नसल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिला विचारलं. त्यावेळी तिने शेजारच्या दादाने काय केलं? त्यावेळी तिने सांगितले, यानंतर पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीला १४ दिवसांसाठी भिवंडी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे बदलापुरात पुन्हा एकदा संताप व्यक्त होऊ लागला असून या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जात आहे.
गेल्यावर्षी बदलापूर येथील एका नामवंत शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केले होते. या घटनेमुळे बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बदलापूरकर येथे आंदोलंन पेटले होते. संपूर्ण बदलापूर बंद करण्यात आले होते. या प्रकरणी खटला सुरू असतांना, त्याला न्यायालयात नेले जात होते. यावेळी अक्षय शिंदेने पोलिसांच्या जीपमधून जात असतानाच पोलिसांची बंदूक खेचून घेत गोळीबार केला. यात पोलिसांनी देखील अक्षय शिंदेवर गोळीबार करत त्याचा एन्काऊंटर केला होता.