सौजन्य - नवराष्ट्र टीम
म्हसवड : म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील देवापूर येथील कांता बनसोडे यांना जादुटोणा करुन पैशाचा पाऊस पाडुन रक्कम १० पट करुन देण्याचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या भोंदु बाबा मंगेश गौतम भागवत (वय वर्ष ३२ रा. कळस, ता. इंदापूर) याला म्हसवड पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर त्याला मदत करणारा त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे हा अद्यापही फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत म्हसवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांता वामन बनसोडे हे आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त झाल्याची माहिती म्हसवड येथील सर्जेराव वाघमारे यांना समजताच त्यांच्याकडे सेवानिवृत्तीचा आलेला पैसा पाहून ते पैसे जादुटोणा करुन आणखी १० पट करुन देण्याचे आमिष दाखवत त्यांना वाघमारे यांनी त्यांना भोंदु बाबाच्या घरी नेले. त्याठिकाणी गेल्यावर भोंदु बाबा मंगेश भागवत याने त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून गोल रिंगणात बसवले व मंत्रोच्चार करीत त्यांच्या हातात एक बॉक्स देत हा बॉक्स २१ दिवसांनी घरी जावून हळदी कुंकू लावुन उघडण्यास सांगितले, त्यापुर्वी कांता बनसोडे यांच्याकडून या भोंदुबाबाने ३६ लाख रुपये घेतले तर हातात दिलेल्या बॉक्समधील रक्कम ही १० पट म्हणजे ३६ कोटी रुपये होतील असे सांगितले.
दरम्यान त्यानंतर कांता बनसोडे हे तो बॉक्स घेऊन घरी आले व तो बॉक्स त्यांनी घरातील देव्हार्यावर ठेवला, २१ दिवसानंतर त्यांनी तो बॉक्स उघडला असता त्यामध्ये पेपर कात्रण केलेली रद्दी आढळल्याने त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे भोंदु बाबाचे सहकारी सर्जेराव वाघमारेला सांगितले. त्यावेळी तुमचे ग्रहमान ठिक नाही, पुन्हा मंत्रोपच्चार करुन देतो असे मंगेश भागवत याने सांगितल्यावर कांता बनसोडे यांनी त्याला नकार देत आपले पैसे परत मागितले त्यावर त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यावर कांता बनसोडे यांनी दिनांक ४ जानेवारी रोजी अखेर भोंदु बाबा व त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे या दोघांविरोधात म्हसवड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
ही तक्रार दाखल होताच गुन्हाची गंभीरता पाहुन सहाय्यक पोलीस निरिक्षक सखाराम बिराजदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांना याबाबतची माहिती दिली. शेंडगे यांनीही तात्काळ म्हसवड येथे जाऊन देवापुर येथील कांता बनसोडे यांच्या घरी भेट देत तपासाच्या योग्य त्या सुचना बिराजदार यांना दिल्या. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत भोंदु बाबा मंगेश गौतम भागवतला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. अद्यापही त्याचा साथीदार असलेला सर्जेराव वाघमारे हा फरार असून त्याचाही म्हसवड पोलीस शोध घेत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले
दरम्यान पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदु बाबा मंगेश भागवतने माण तालुक्यातील अनेक जणांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तवली जात असून या पैशाची चटक किती जणांना लागली होती, किती जण या पैशाच्या पाऊसात भिजले आहेत, याचाही शोध म्हसवड पोलीस घेत आहेत. तर याप्रकरणी फरार असलेल्या वाघमारेने आणखी किती जणांशी पैशाचा पाऊस पाडण्याचा करार केला होता याचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी अटक केलेला मुख्य आरोपी मंगेश भागवतला म्हसवड न्यायालयात पोलीसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यास २१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.