खोक्या भाईने मारहाण केलेल्या बाप-लेकावर गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
Beed Crime News In Maarthi : आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या जवळीक असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई यांने शिरुर गावातील दिलीप ढाकणे यांच्यासह त्यांचा मुलगा महेश ढाकणेला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. यामध्ये ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांविरोधात अॅटरॉसिटी आणि आणि पॉक्सो अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. आतापर्यंत खोक्याने परिसरातील साधारण २०० पेक्षा अधिक हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावातील लोकांचं म्हणणं आहे. याशिवाय डोंगरात वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत.
काही दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडत होते. त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला. तेव्हा खोक्या भाई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली होती. यामध्ये दिलीप ढाकणे यांचे ८ दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला लंगडत चालावे लागत आहे. त्याच्या अंगावर वारही आहेत.
१९ फेब्रुवारी रोजी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते, परंतु एपीआय धोरवाड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती देखील ढाकणे पिता-पुत्राने यापूर्वी व्यक्त केली होती. आता ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच पोक्सोअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत.
दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्यान यांनी हरीण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केल असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी देखील केला होता. यानंतर सतीश भोसलेच्या घरावर वनविभागाने छापा टाकला. सतीश भोसलेच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडले आहे. धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या आहेत. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले.