संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शिक्रापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एक महिन्यापूर्वी चोरट्यांनी मेडिकल लक्ष करत एका रात्रीत तब्बल आठ मेडिकलचे शटर उचकटून प्रत्येक मेडिकल मधील रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेतील चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
यलाप्पा परशुराम सुतार, संदीप शंकर सोनार या दोघांसह एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे १० फेब्रुवारी २०२५ रोजी अनेक मेडिकल चालक मेडिकल बंद करुन घरी गेले असताना दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास शिक्रापूर तळेगाव रोड येथील रमेश मेडिकल, कल्याणी मेडिकल, मातोश्री मेडिकल, श्री स्वामी समर्थ मेडिकल, मलठण फाटा येथील साई मेडिको, न्यू श्रेया मेडिकल, आराध्या मेडिकल तर हिवरे रोड येथील प्रकाश मेडिकल असे आठ मेडिकल चोरट्यांनी फोडून प्रत्येक मेडिकल मधील काही रोख रक्कमची चोरी केली. ही घटना काही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती.
याबाबत तेजस प्रमोद गायकवाड वय २५ वर्षे रा. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला होता, या गुन्ह्याचा तपास करत असताना यातील आरोपी पिंपळे जगताप येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, पोलीस ह्वालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ यांनी पिंपळे जगताप येथे सापळा रचत यलाप्पा परशुराम सुतार (वय २१ वर्षे, रा. नेहरूनगर चिंचवड, पुणे) व संदीप शंकर सोनार (वय १८ वर्षे रा. वल्लभनगर चिंचवड, पुणे) या दोघांसह एका अल्पवयीन युवकाला याब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने दोघांना अटक करत पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व प्रताप जगताप हे करत आहेत.