लाच मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल (फोटो- istockphoto)
काेल्हापूर/इचलकरंजी: गुन्ह्यात जप्त केलेली आयशर टेम्पो सोडविण्यासह न्यायालयातील खटल्यात मदत करण्यासाठी ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.
दरम्यान ,लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने या प्रकरणी जाधवसह दोघांना ताब्यात घेतले आहे. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक शंकर जाधव (वय ४४, रा. बापट कॅम्प) याच्यासह उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे (रा. निगडेवाडी, उचगाव, ता. करवीर) आणि कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (वय ३३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हे तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
गुन्ह्यात जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. एपीआय जाधव आणि कॉन्स्टेबल कांबळे यांना पथकाने ताब्यात घेतले. तर पीएसआय शिरगिरे पळून गेला. गुरुवारी दुपारीच गांधीनगर पोलिस ठाण्यात ही कारवाई झाली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव याने गेल्या महिन्यात जनावरांची अवैध वाहतूक करणा-या संशयितांवर कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी टेम्पो मालकाकडे लाचेची मागणी केली होती.
हेही वाचा: सांगलीत महिला पोलिस हवालदार लाचेच्या जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
टेम्पो परत मिळावी यासाठी तक्रारदार गांधीनगर पोलिस ठाण्यात वारंवार चकरा मारत होता. त्याच्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून जाधव आणि कांबळे या दोघांना ताब्यात घेतले. तर कारवाईची चाहूल लागताच उपनिरीक्षक शिरगिरे पळून गेला. पोलीस ठाण्यातच झालेल्या या कारवाईने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सात डिसेंबरला दिलीप जाधव यांची गांधीनगर पोलीस ठाण्यातून तडकाफडकी कोल्हापूर नियंत्रण कक्षाकडे बदली केली होती.
लाच लुचपतच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. गांधीनगरचे तत्कालीन एपीआय जाधव यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते.त्यानंतरच त्यांची नियंत्रण कक्षाकडे बदली करण्यात आली होती बदलीनंतरही जाधव गांधीनगर पोलीस ठाण्यात जात असल्याचेही समजते , आज त्याच पोलीस ठाण्यात त्यांना पकडण्यात आले.
सांगलीत महिला पोलिस हवालदार लाचेच्या जाळ्यात
सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आले आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.






