
Digital Fraud : बनावट सहीद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार; खात्यातून 149 कोटींचे व्यवहार झाल्याचे उघड, तक्रारदाराने...
पुणे : कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारप्रकरणी आरोपी महिला शिक्षिकेसह एका व्यावसायिकाचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला. संबंधित कंपनीच्या खात्यातून आरोपींशी संबंधित कंपन्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास येत असून, या आर्थिक व्यवहारांबाबत वस्तू व सेवा कर विभागासह (जीएसटी) अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) तपास सुरू केल्याची नोंद घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोरेश्वर कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.
निविदा भरून सरकारी कामे करणाऱ्या कंपनीच्या बँक खात्यातून डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर आणि बनावट स्वाक्षरी करून हा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. अपर्णा वैद्य आणि प्रमोद तलवार अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मुख्य आरोपी कमलदीप अमरिकसिंग वैद्य, सनदी लेखापाल अमर प्रमोद तलवार, सर्जेराव जेधे, दिग्विजय जेधे अशा सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, खराडी येथील खासगी कंपनी चालकाने तक्रार दिली आहे. ही घटना २०२३ ते गुन्हा दाखल करण्याच्या कालावधीत घडली. तक्रारदारांना कर्जाची गरज असल्याने मुख्य आरोपी कमलदीपसिंहने त्यांची ओळख सीए अमर तलवार यांच्याशी करून दिली.
खात्यातून 149 कोटींचे व्यवहार झाल्याचे उघड
तक्रारदाराला खासगी बँकेच्या औंध शाखेत खाते उघडण्यास सांगितले; तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीकडून डिजिटल स्वाक्षरी असलेली पेन ड्राईव्ह आणि सिमकार्ड घेतले. तक्रारदाराने फेब्रुवारी २०२४ मध्ये सहकारी बँकेकडून आठ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन सोळा डंपर ट्रक खरेदी केले. सरकारी निविदांमधील कामासाठी हे ट्रक वापरले जात होते.
दररोज 24 हजार भाडे देण्याचा तोंडी करार
या ट्रकपैकी १४ ट्रक जून २०२४ मध्ये सर्जेराव जेधे आणि दिग्विजय जेधे यांच्याकडे दररोज प्रत्येकी २४ हजार रुपये भाडे देण्याच्या तोंडी करारावर देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, भाड्याची रक्कम न दिल्याने संबंधितांकडून धमक्या देण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये तक्रारदाराला जीएसटी कार्यालयाकडून नोटीस आली. त्यांच्या बँक खात्यातून १४९ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
गुन्हा दाखल करण्यास झाला 16 महिन्यांचा विलंब
या गुन्ह्यात आरोपी अपर्णा वैद्य आणि प्रमोद तलवार यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सोळा महिन्यांचा विलंब झाल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. या गुन्ह्याचा तपास तपास सुरू असून, आरोपींचा संबंध असलेल्या कंपन्यांच्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांसदर्भात जीएसटी आणि ईडीकडूनही तपास सुरू आहे, असे नमूद करत न्यायालयाने आरोपींच्या कोठडीतील चौकशीची गरज व्यक्त केली.