प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
शवविच्छेदनासाठी पूर्णेकर यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी पार्थिव ताब्यात घेतले. पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी सर्व आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनाची भूमिका घेतली. कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत पार्थिव पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांच्यासह कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्याकडे गेले. राम पूर्णेकर यांनी आपल्या वडिलांच्या हत्येमागे कट असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी हत्येचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयितांविरोधात कारवाई सुरू केली आहे. बुधवारी दुपारपर्यंतच्या वृत्तांनुसार पप्या ऊर्फ पपू शिंदे आणि आकाश निमसे यांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही तपास केला जात आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीसह पाच संशयितांची नावे समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलिसांची एकूण नऊ पथके कार्यरत आहेत. घटनास्थळासह परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोर घटनास्थळी कसे पोहोचले आणि हल्ल्यानंतर कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हल्ल्यात सहभागी सर्व आरोपी आणि हत्येमागील कथित सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुढे नेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही या हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. गोळीबार करणारे कोण होते, हल्ल्याचे निर्देश कोणी दिले आणि या हत्येमागे नेमके कोण आहे, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या – Navarashtra






