स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Datta Gade News :- पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी काही पथके तयार केली होती. त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू होता. अखेर पोलिसांना यश आले आहे. इतकेच नाहीतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पुणे पोलिस नागरिकांची मदत घेताना दिसले होते. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. असे असताना पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यानच त्याला शिरूरच्या गुणाट गावातून अटक करण्यात आली.
विविध ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे आरोपीला लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला होता. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलीस ठाण्याशी किंवा १०० क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी बसस्थानकात आली. ती फलटणला निघाली होती. त्यासाठी बसची वाट पाहात थांबली असताना गाडेने तिला हेरले. त्याने ताई फलटणची बस येथे लागत नाही, पलीक़डे लागते असे तिला सांगितले. मात्र पीडितेने मी नेहमीच येथून बसते असे म्हणत पलीकडे जाण्यास नकार दिला. त्यावर त्याने मी इथे गेली दहा वर्षे काम करत आहे, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर तिला स्वारगेट – सोलापूर शिवशाही बसजवळ नेले. जेव्हा पीडिता बसमध्ये चढली त्यानंतर गाडे देखील तिच्या मागे-मागे गेला. नंतर त्याने पीडित तरूणीवर अत्याचार केला.