
Dhule Bribery Case :लाचेची रक्कम घेतली अन् एसीबीने पकडले; दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात,तिसरा फरार
२० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, साक्री रोडवरून गौण खनिजाची वाहतूक करणारा हायवा महसूल विभागाने ताब्यात घेतला होता. या वाहनावर पुढील कारवाई न करण्यासाठी तलाठी दाभाडे यांनी वाहनमालकाकडे २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एसीबीने रचला साफळा
या मागणीपैकी उर्वरित १२ हजार रुपये खासगी पंटर जयेश चौधरी याच्यामार्फत देण्याचे ठरले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने चाळीसगाव चौफुली परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पंटर चौधरी याने तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर त्याने तलाठी नगराळे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पुढे ही रक्कम तलाठी दाभाडे यांच्याकडे सुपूर्द केली जात असताना एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे. या प्रकरणात दोन तलाठ्यांना ताब्यात घेण्यात आले असून खासगी पंटरवरही कारवाई करण्यात आली आहे. लाचेच्या रकमेत आणखी एका तलाठ्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याने संबंधित तिसऱ्या तलाठ्याचा शोध सुरू आहे. कारवाईची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढल्याची माहिती आहे.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील अनधिकृत वसुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एसीबीकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, लाचेच्या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
बारामतीतही हवालदाराला लाच घेताना अटक
दरम्यान, बारामती येथे झुंबा डान्स क्लास आणि जिमवर कारवाई न करण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलिसातील हवालदार महेश उगले याच्यावरही एसीबीने कारवाई केली. भिगवण रस्त्यावरील एका बँकेच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. संबंधित क्लास तक्रारदाराच्या पत्नीचा असल्याची माहिती आहे.