
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरचा मृत्यू; माजी मंत्र्यांच्या ओएसडीवर आरोप, आरोग्यमंत्र्यांनी दिलं कारवाईच आश्वासन
चिठ्ठीत दबावाचा उल्लेख
डॉ. रुपनवर यांनी मागे ठेवलेल्या चिठ्ठीत काही व्यक्तींकडून आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा उल्लेख केल्याची माहिती आहे. त्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडीचाही संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, चिठ्ठीत करण्यात आलेले आरोप हे सध्या तपासाचा विषय असून, त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी डॉ. रुपनवर यांची तक्रार नोंदवून घेतली होती. त्यामुळे संबंधित व्यक्तींचे जबाब, तक्रारीतील बाबी आणि उपलब्ध पुरावे तपासूनच पुढील कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई
डॉ. रुपनवर यांना रुग्णालयातील काही डॉक्टरांकडून त्रास होत असल्याची तक्रार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडूनही या प्रकरणाची पडताळणी सुरू आहे.
दोषींनवर होणार कठोर कारवाई
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूची घटना गंभीर असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कायदा सगळ्यांसाठी समान-प्रकाश आबिटकर
एखाद्या व्यक्ती विरोधात तक्रार असल्यास कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने दाद मागता येते. डॉ. रुपनवर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यामुळे पोलिस तपासातून संबंधित आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. कायद्यापुढे सर्व समान असून, कारवाई करताना व्यक्तीचे पद किंवा दर्जा पाहिला जाणार नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय क्षेत्रात हळहळ
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना कार्यस्थळी येणारा मानसिक ताण, वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित त्रासाबाबतच्या तक्रारी आणि त्यांचे प्रभावी निवारण याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणातील आरोप आणि मृत्यूमागील नेमकी पार्श्वभूमी पोलिस तपास व विभागीय चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.