नवी दिल्ली : ड्रग्जविरोधातील (Anti Drugs) भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात एटीएस (Gujarat ATS) यांच्या संयुक्त कारवाईला यश आले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाईत शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ५० किलो हेरॉईन (Heroin) ड्रग्ज घेऊन जाणारी पाकिस्तानी (Pakistan) बोट पकडली. या हेरॉईनची अंदाजे किंमत सुमारे ३५० कोटी रुपये आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने बोटीवरील ६ जणांना अटकही केली आहे. पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ बंदरात आणण्यात येत आहे. खराब हवामानानंतरही गुजरात एटीएससह आयसीजीने हे मिशन पूर्ण केले आहे.
गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दलची एटीएस सोबतची ही सहावी कारवाई आहे. तर, भारतीय तटरक्षक दलने ड्रग्जने भरलेली बोट पकडण्याची एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे २०० कोटी रुपयांचे ४० किलो हेरॉईन एफएम पकडण्यात आले होते. कोचीमध्ये यापूर्वी एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोटीतून कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त केले आहे.