
फोटो सौजन्य: iStock
वाढत्या टेक्नॉलॉजीसोबतच सायबर क्राइमच्या घटनेत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. आधी फक्त सायबर चोरटे फक्त जेष्ठ नागरिकांनाच टार्गेट करत होते. मात्र, आता ते सुशिक्षित व्यक्तींना सुद्धा टार्गेट करत आहे. नुकतेच अहिल्यानगर शहरातील अभियंता सायबर क्राइमचा शिकार झाला आहे.
अहिल्यानगर शहरातील एका सिव्हिल इंजिनिअरला सायबर गुन्हेगारांनी मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्याचे भासवून तब्बल ८ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० या कालावधीत घडली. याबाबत पीडित अभियंत्याने ३१ ऑक्टोबर रोजी नगर सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
२४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादींना ‘राज आनंद’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला ब्लू डार्ट कुरिअर कंपनीचा कर्मचारी सांगत, “तुम्ही अवैध पार्सल पाठवले असून त्याबाबत मुंबई सायबर सेलशी संपर्क साधा,” असे सांगितले. त्यानंतर एका क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
जळगाव पॅटर्न राज्यभर अंमलात! जिल्ह्यातील १६२५ शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची झाली स्थापना
फिर्यादीने दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केल्यावर कॉल उचलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव विजय पाल असे सांगितले. त्याने फिर्यादीला “तुम्ही मनी लॉन्ड्रिंग आणि हवाला प्रकरणात सामील आहात, त्यामुळे तुम्हाला डिजीटल अरेस्ट करण्यात आले आहे,” असे सांगत सर्व बँक डिटेल्स मागितले.
फिर्यादीने आपले कान्हूर पठार मल्टीस्टेट सोसायटीतील बचत खाते आणि त्यामध्ये ८.८० लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर भामट्याने त्यांना “तुमच्या खात्यांची चौकशी पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील” असे सांगून कुमार एजन्सी, बंधन बँक बलरामपूर या खात्यावर सर्व पैसे पाठविण्यास भाग पाडले.
भीतीपोटी फिर्यादीने संपूर्ण रक्कम पाठविली. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पैदाम करत आहेत.