Crime Case
पिंपरी : पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे एका व्हिलामध्ये कारवाई करत चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. एजंट महिला ग्राहकांना कासारसाई, लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगत त्यानंतर परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली की, एक परदेशी महिला एजंट ग्राहकांना व्हॉट्सअप कॉल करून लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगते. त्यानंतर परदेशी महिलांना तिथे घेऊन जात त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला असता, संबंधित परदेशी महिलेने एका ग्राहकाला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारसाई येथे एक व्हिला बुक करण्यास सांगितले.
व्हिला बुक केल्याचे एजंट महिलेला सांगितले असता ती चार परदेशी महिलांना घेऊन आली. त्यानंतर पोलिसांनी एजंट महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण २० हजार २० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तसेच चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, मुकुंद वारे, श्रद्धा भरगुडे, नीलम बुचडे, संगीता जाधव यांनी केली.
चंदननगर येथेही वेश्या व्यवसाय
दुसकीकडे, चंदननगर येथील मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश राजकुमार पुरी (वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी (चंदननगर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.