
कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू
जळगाव : पावसाळ्यात विजेचा धक्का लागून अनेक दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता जळगाव शहरातील अक्सानगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. घराच्या छतावर कपडे वाळवत असताना उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये मुस्लिम धर्मगुरू शब्बीर खान आणि त्यांची मुलगी आलिया खान यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया खान छतावर कपडे वाळवत असताना तिच्या हाताला वीज वाहक तारेला स्पर्श झाला आणि तिला जागीच झटका बसला. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या शब्बीर खान यांनाही विजेचा जोरदार शॉक बसला आणि तेही जागीच मृत्यू पावले. दोघांना वाचवण्यासाठी आलेली शब्बीर खान यांची भाची मारिया खान गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेदेखील वाचा : कपडे वाळवणं बेतलं जीवावर; विजेच्या तीव्र धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू, मुलगा झोपेतून उठला अन्…
दरम्यान, या दुर्घटनेनंतर खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाने उच्चदाब वीज तारा आणि छतावरील कामांच्या सुरक्षिततेसंदर्भात जनजागृती वाढवण्याचे आवाहन केले आहे. ही घटना घरगुती काळजी आणि वीज सुरक्षा नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आणत आहे.
काही दिवसांपूर्वी धुळ्यातही घडली घटना
कपडे वाळवताना अचानक एका महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या मुलालाही विजेचा धक्का बसला. यात माय-लेकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.21) सकाळच्या सुमारास खापरखेडा येथील दहेगाव रोडवरील जयभोलेनगरात घडली. कपडे वाळविताना अचानक निर्मलाला विजेचा जबर धक्का बसला. आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला लोकेश क्षणाचाही विलंब न करता आईला वाचवण्यासाठी धावला. लोकेशने आईला जिवंत तारेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईला हात लावताच त्यालाही जबर धक्का बसला.
हेदेखील वाचा : चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral