
लग्नाचे आमिष; तरुणीवर अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याचाराची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाचे आमिष दाखवून एका 23 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करुन लग्नास नकार देण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी मनोहर लिंबाजी चव्हाण (वय २८, रा. गंगाखेड, जि. परभणी) याला सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. तर त्याला 5 नोव्हेंबपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एस. जांबोटकर यांनी दिले. याप्रकरणात २३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही अभियांत्रिकी शिक्षण घेत असून, ती गेल्या काही वर्षांपासून डेटा सायन्सच्या क्लाससाठी शहरात राहत होती.
दरम्यान, आरोपी मनोहर चव्हाण हा पीडितेचा ओळखीचा असल्याने त्यांच्यात मैत्री झाली. आणि ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडली. 2022 पासून आरोपी हा पीडितेला भेटण्यासाठी शहरात येत होता. या काळात दोघे विविध लॉजमध्ये भेटत असत. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर लग्नाचा विषय पुढे आल्यानंतर मात्र आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
लॉजमध्ये नेलं अन् जीवे मारण्याची धमकी
जुलै 2025 मध्ये आरोपीने शहरातील एका लॉजमध्ये पीडितेला बोलावून तिच्या घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप पीडितेकडून फिर्यादीत करण्यात आला आहे. पीडितेने या प्रकरणाची तक्रार सुरुवातीला गंगाखेड पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, घटनास्थळ छत्रपती संभाजीनगर येथे असल्याने गुन्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.