
Young man murdered over minor dispute in cricket match Maval Crime News
Pune Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना सोमाटणे फाटा येथे पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या मैदानावर हा प्रकार झाला आहे. गुरुवारी (दि.05, फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. (Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथील मैदानावर स्थानिक तरुणांचा क्रिकेट सामना सुरू होता. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांची गर्दी जमली होती. याच दरम्यान सामना पाहणाऱ्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद अधिक तीव्र झाल्यानंतर मृत तरुणाने आरोपीला शिवीगाळ केल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने जवळच पडलेला दगड उचलून २० ते २५ वर्षे वयोगटातील त्या तरुणाच्या डोक्यात जोरात मारला.
हे देखील वाचा : Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट
डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार अनेक तरुणांच्या समक्ष घडल्याने मैदानावर एकच खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपीला ताब्यात घेतले. सनी प्रमोद चव्हाण (वय २४, रा. शिरगाव, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर; सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ
दरम्यान, खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवींद्र खामगळ करत आहेत.
निवडणूक नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त
विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीस पकडण्यात आले आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. २९ जानेवारी) मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे ही कारवाई केली. या प्रकरणी अंतु रामदास शेटे (वय ४०, रा. नवलाख उंब्रे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या निवडणूक कर्तव्यावर असलेले अजिंक्य सुनील म्हेत्रे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून वाहनासह सुमारे ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा साठा विक्रीच्या उद्देशाने आणण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. निवडणूक काळात बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.