उत्तर प्रदेशात सौरभ हत्याकांडाची पुनरावृत्ती; पत्नीकडून पतीची हत्या, हृदयविकाराचा झटका आल्याचे भासवले अन्...
बिजनौर : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूत या मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या हत्याकांडासारखीच एक घटना समोर आली आहे. मुस्कानप्रमाणेच बिजनोरमध्येही एका पत्नीने तिच्या पतीची हत्या केली. तिने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला. मात्र, हत्येनंतर तिने पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मरण पावला, असे भासवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना जेव्हा ही बाब कळली तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्येचा खुलासा झाला. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पत्नी शिवानीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती पोलिसांना दिशाभूल करत राहिली. पण नंतर तिने तिचा गुन्हा कबूल केला. तिच्या पतीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्याचवेळी, दीपकच्या पत्नीने हा गुन्हा कोणाच्या मदतीने केला हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिस प्रेमप्रकरण आणि इतर पैलूंचा तपास करत आहेत. ही घटना बिजनौरच्या नजीबाबाद भागात घडली.
हलदुआर पोलीस स्टेशन परिसरातील मोहल्ला आदर्श नगर येथील रहिवासी दीपक कुमार हा नजीबाबाद रेल्वे स्टेशनच्या ‘कॅरेज अँड वॅगन’मध्ये तांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत होता. तो त्याच्या पत्नी आणि एक वर्षाच्या मुलासह राहत होता. 4 एप्रिल रोजी दीपकचा त्याच्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि ती स्वतः त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. दीपकच्या मृत्यूनंतर, त्याच्या पत्नीला त्याचे शवविच्छेदन करायचे नव्हते, परंतु त्याच्या मानेवरील खुणा पाहून कुटुंबाने शवविच्छेदन केले.
पैसे हडपण्यासाठी केली हत्या
पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर कुटुंबाला धक्का बसला. शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की त्याचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर गळा दाबून झाल्याचे दिसून आले. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पत्नी शिवानीवर हत्येचा आरोप करत गुन्हा दाखल केला.