
बहिणीस पळवून नेण्यास मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या
इचलकरंजी : बहिणीस पळवून नेणाऱ्यास मदत केल्याच्या रागातून शुभम कुमार सादळे (वय २७, रा. काळम्मावाडी वसाहत, रांगोळी) याचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत दर्शन कांबळे, सागर माने (दोघे रा. माळभाग रांगोळी) व अन्य एकजण अशा तिघांच्या विरोधात मयताचा भाऊजी रणजित मधुकर कमते (वय ३६ रा. माळभाग रांगोळी) याने फिर्याद दिली आहे.
रांगोळी (ता. हातकणंगले) येथे राहणारा शुभम सादळे याचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. गुरुवारी रात्री उशिरा शुभम व त्याचा मित्र संकेत सुदर्शन देसाई हे दोघेजण रांगोळी गावातून काळम्मवाडी वसाहत येथे येऊन तेथील स्मशानभूमी परिसरात बोलत थांबले होते. त्याचवेळी त्याठिकाणी दर्शन कांबळे, सागर माने व अन्य एक असे तिघेजण आले. दर्शन याने शुभमला तुझा चुलत भाऊ प्रदीप काठे आहे, त्याला फोन लाव आणि येथे बोलवं, असे सांगितले.
त्यावर शुभम हा प्रदीपला फोन लावत असतानाच शुभम याला शिवीगाळ करत सागर याने शुभमला पाठीमागून पकडून ठेवले तर दर्शन याने त्याच्याकडील धारदार हत्याराने शुभमच्या पोटात भोसकले. त्यामध्ये पोटात वर्मी घाव बसल्याने शुभम जाग्यावरच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.
मदत केल्याचा आला राग अन्…
दर्शन कांबळे याच्या बहिणीला बंड्या नामक तरुणाने पळवून नेले होते. त्यामध्ये शुभम व प्रदीप सादळे यांनी बंड्याला मदत केल्याचा राग दर्शनला होता. त्या रागातून मित्रांच्या सहकार्याने दर्शन याने शुभम सादळे याचा गेम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पथके रवाना करण्यात आली आहेत.
चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू
चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथील घर क्रमांक 517 मध्ये एकटी राहत असलेल्या मंदा प्रमोद म्हात्रे (वय 70) या वृद्ध महिलेचा जबरी चोरीदरम्यान खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime: सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त, रक्ताचा सडा पाहून पोलीसही चक्रावले!