धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश
राज्य पोलिसांनी सिकंदराबादमध्ये बनावट सरोगसी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचा प्रमुख सूत्रधार बेकायदेशीर फर्टिलिटी क्लिनिकद्वारे सरोगसीच्या नावाखाली नवजात बाळांची खरेदी-विक्री करत होता. आयव्हीएफ सेंटरने हैदराबादमधील एका गरीब जोडप्याकडून ९०,००० ला नवजात बाळ विकत घेतले आणि ते दुसऱ्या जोडप्याला सरोगसी बेबी म्हणून ३५ लाख रुपयांना विकलं असून डीएनए टेस्टमधून हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये एका जोडप्याने कथित क्लिनिकमध्ये आयव्हीएफ उपचार मागितले होते.त्यावर क्लिनिकने त्यांना सरोगसीचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला आणि बाळ जैविकदृष्ट्या त्यांचेच असेल असे आश्वासन दिले. यानंतर, जून २०२५ मध्ये दोन दिवसांचे बाळ या जोडप्याला देण्यात आले. या जोडप्याने नवजात बाळासह त्यांची डीएनए चाचणी केली तेव्हा डीएनए जुळत नसल्याने फसवणूक उघडकीस आली. आयव्हीएफ सेंटरने हैदराबादमधील एका गरीब जोडप्याकडून ९०,००० ला नवजात बाळ विकत घेतले आणि ते दुसऱ्या जोडप्याला सरोगसी बेबी म्हणून ३५ लाख रुपयांना विकले. हैदराबाद पोलिसांनी युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरच्या मुख्य आरोपी डॉ. अथलुरी नम्रता (६४), सरकारी गांधी रुग्णालयाच्या भूलतज्ज्ञ डॉ. नारगुला सदानंदम (४१), एजंट आणि तंत्रज्ञांसह ८ जणांना अटक केली. ग्राहकांची फसवणूक आणि मूल विकण्याचे रॅकेट चालवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
२०२१मध्ये परवाना रद्द
२०२१ मध्ये सृष्टीचा परवाना रद्द करण्यात आल्याचेही पोलिसांना आढळून आले. डॉ. नम्रता ते बेकायदेशीरपणे चालवत होती. ती कोंडापूर (हैदराबाद), विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे आणखी तीन केंद्रे चालवत आहे. रविवारी या सर्वांवर छापे टाकण्यात आले. अशा प्रकारे हा घोटाळा उघडकीस आला. डीसीपी (उत्तर क्षेत्र) एस रश्मी पेरुमल म्हणाल्या, आम्ही प्रजनन केंद्राच्या विविध शाखांमध्ये सरोगसी आणि आयव्हीएफ उपचार घेतलेल्या इतर जोडप्यांचीही चौकशी करत आहोत. यापूर्वी २०१६ आणि २०२० मध्ये डॉ. नम्रता यांच्यावर दोनदा चौकशी करण्यात आली होती.
आरोपींना १४ दिवसांची कोठडी
सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डीसीपी म्हणाले की, हे सरोगसीचे प्रकरण नाही. डॉ. नम्रता आणि त्यांचे कर्मचारी गरीब गर्भवती महिलांकडून खरेदी केलेली बाळे पैशाचे आमिष दाखवून निपुत्रिक जोडप्यांना विकत होते. ताज्या प्रकरणात विकल्या गेलेल्या बाळाचे जैविक पालक मोहम्मद अली आदिक (३८) आणि नसरीन बेगम (२५) हे आसामचे आहेत आणि हैदराबादमध्ये राहत होते. त्यांना विशाखापट्टणममध्ये प्रसूतीसाठी ९०,००० रुपये देण्यात आले होते आणि ते बाळ तिथे दुसऱ्या जोडप्याला त्यांचे जैविक मूल म्हणून विकण्यात आले होते.