वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. याच प्रकरणात सध्या तुरुंगात असेल्या वाल्मिक कराडसंदर्भात विशेष मकोका न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. वाल्मीक कराडने निर्दोष मुक्ततेसाठी सादर केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहेच शिवाय त्याला खुनातील मुख्य सूत्रधार ठरवलं आहे.
वाल्मीक कराडविरोधात २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, गेल्या दहा वर्षांमध्ये गंभीर स्वरुपाचे किमान सात गुन्हे त्याच्यावर नोंदवण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये खंडणी, धमक्या देणं, फोनवरून जीवे मारण्याची धमकी, महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव आणणं आणि अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागणी या गुन्ह्यांचा समावेश आहे.
कराड एक संघटीत गुन्हेगारी टोळी चालवतो.
‘आवादा‘ कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला गेला.
संतोष देशमुख यांनी या खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे कराड व त्याच्या साथीदारांनी त्यांचं अपहरण करून हत्या केली.
कराडनेच या गुन्ह्याचं नियोजन केलं असल्याचं डीजिटल, व्हिडीओ, फॉरेन्सिक आणि न्यायवैद्यकीय पुराव्यांतून स्पष्ट होतं.
न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे विचारात घेतले असून, या सर्व बाबींवरून कराड या प्रकरणात सामील असल्यांचं सिद्ध होतं.
दरम्यान वाल्मीक कराडच्या निर्दोष मुक्ततेची व्याप्ती अत्यंत मर्यादित आहे, आणि या प्रकरणात खटला पुढे चालू ठेवण्यासाठी भरपूर पुरावे उपलब्ध असल्याचं सांगत न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर याच प्रकरणात गंभीर आरोप झाले. सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. वाल्मिक कराड मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी जनआंदोलने निघाला. अखेर वाल्मिक कराडला अटक करून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. सध्या तो तुरुंगात आहे. या प्रकरणानंतर बीडचं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालं होतं. तब्बल दोन महिने महाराष्ट्राचं लक्ष बीडकडे लागलं होतं.