कारंजा शहरात 17 गॅस सिलिंडर जप्त
कारंजा : एका गॅस सिलेंडरमधील अतिज्वलनशीन वायू थेट दुसऱ्या गॅस सिलेंडरमध्ये भरण्याचा गोरखधंदा कारंजा शहरात सुरू होता. या प्रकरणातील काळाबाजारी संबंधित सिलेंडरची चढ्यादराने विक्रीही करत होता. हा धक्कादायक प्रकार तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर उजेडात आला. या कारवाईत तब्बल 17 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. तसेच काळाबाजार करणाऱ्यावर कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारंजा शहरातील वॉर्ड 6 परिसरात अजय हरिशचंद्र पटले याच्याकडे मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर असून, तो अतिज्वलनशील गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती कारंजाच्या तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांना मिळाली. तहसीलदार डॉ. मोहने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षण अधिकारी भूषण राऊत, सोनाली रेवाडे, पोलिस उपनिरीक्षक गिरधर पेंदोर यांच्या पथकाने अजय पटले याचे निवासस्थान गाठले.
अधिकाऱ्यांनी घर-परिसराची बारकाईने पाहणी केली असता अतिज्वलनशील गॅसची रिफिलिंग केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित प्रकार नेमका काय? याबाबतची अधिकची माहिती अधिकाऱ्यांनी अजय पटले याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पण, अजय पटले करत असलेला प्रकार जीवनावश्यक वस्तू संबंधित नियमांचे उल्लंघन करणारा असल्याने त्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तसेच पटले याच्या घरातून एकूण 17 गॅस सिलिंडर जप्त केले.
जप्त करण्यात आलेले हे सिलेंडर संभाव्य धोका लक्षात घेता कारंजा येथील इंडियन गॅसच्या अधिकृत एजन्सी धारकाला सूपूर्द करण्यात आले आहे. तर आरोपी अजय पटले याच्याविरुद्ध कारंजा पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
भरलेल्या सिलिंडरचा कोण करायचा पुरवठा ?
अजय पटले याच्या घरून अधिकाऱ्यांनी घरगुती वापराचे 10 भरलेले गॅस सिलिंडर, 1 छोटा तर 5 मोठे रिकामे गॅस सिलिंडर तर एक कमी प्रमाणात अतिज्वलनशील गॅस असलेले व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर, असे एकूण 17 गॅस सिलिंडर जप्त केले. पण, पटले याला घरगुती वापराचे भरलेल्या गॅस सिलिंडरचा पुरवठा कोण करीत होता, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
धोका पत्करून सुरू होता काळाबाजार
अजय पटले हा एका लोखंडी नळीचा वापर करून गॅस सिलिंडर रिफिल करत होता. इतकेच नव्हे तर त्याच्या घरी मोठ्या प्रमाणात भरलेली गॅस सिलिंडर कारवाई करणाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळाले. अतिज्वलनशील गॅसच्या अवैध रिफिलिंग हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा आहे. पण, याची जाण असतानाही परिसरातील नागरिकांच्या जीवाची पर्वा न करता धोका पत्करून संबंधित काळाबाजार केला जात होता, असे सांगण्यात आले.