जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या मुलीवर व जावयावर वडिलांनी गोळीबार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आरपीएफमधून निवृत्त झालेल्या एका जवानाने, एका लग्नाच्या हळदी समारंभात, आपल्या स्वतःच्या मुलीवर गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावईही गंभीर जखमी झाला आहे. यावेळी जमलेल्या लोकांनी संतापून वडिलांना मारहाण केली, ज्यामध्ये तेही गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री सुमारास डॉ. आंबेडकर नगर भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात तृप्ती अविनाश वाघ (वय २४) आणि अविनाश ईश्वर वाघ (वय २८) असे दांम्पत्याचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाश यांनी प्रेमविवाह केला होता. पण तिच्या वडिलांना किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा. शिरपूर) हा विवाह मान्य नव्हता. दुसरीकडे अविनाशच्या बहिणीचे विवाह ठरला होता. शनिवारी सायंकाळी बहिणीच्या विवाह समारंभासाठी तृप्ती व अविनाश चोपडा येथे त्यांच्या घरी आले होते. लेक आणि जावई हळदीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याची माहिती सासऱ्याला मिळाली होती.
अविनाश वाघ यांच्या बहिणीचा हळदी समारंभ शनिवारी (२६ एप्रिल ) चोपडा शहरातील खाईवाडा परिसरातील आंबेडकरनगर येथे पार पडत होता. या कार्यक्रमासाठी अविनाश आणि त्याची पत्नी तृप्ती चोपडा येथे आले होते. मात्र, तृप्तीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग तिच्या वडिलांच्या निवृत्त सीआरपीएफ जवान किरण अर्जुन मंगले (वय ४८) मनात अजूनही धगधगत होता.
हळदीच्या कार्यक्रमादरम्यान तेथील ठिकाणी पोहोचून त्यांनी मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत तृप्तीचा मृत्यू झाला, तर अविनाशच्या पाठीवर आणि हातावर गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे.हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर तृप्ती आणि तिच्या वडिलांची अचानक भेट झाली. तृप्तीला पाहताच वडिलांनी रिव्हॉल्वरमधून थेट गोळी झाडली. तिला वाचवण्यासाठी अविनाश धावला, परंतु त्यालाही गोळी लागली. गंभीर जखमी झालेल्या अविनाशला तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपी वडिलांना बेदम मारहाण केली. यानंतर शनिवारी रात्री सुमारे ११ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपडा येथे जाऊन घटनेचा आढावा घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.