
Mumbai Fire News: मुंबईत रुग्णालयाच्या टेरेसवर गॅसचा भडका; अचानक लागलेल्या आगीत २ कर्मचारी गंभीर भाजले
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनेच्या वेळी टेरेसवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तसेच जखमींच्या नातेवाइकांकडून माहिती घेण्यात आली आहे. नातेवाइकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाविरोधात नातेवाइकांकडून अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, गॅस सिलिंडरची गळती नेमकी कशी झाली, सिलिंडर टेरेसवर ठेवण्यासंदर्भात आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का आणि आग लागण्यामागे अन्य कोणते कारण होते का, याचा तपास केला जात आहे.
रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी गॅस सिलिंडरची साठवणूक आणि अग्निसुरक्षा व्यवस्था याबाबत या घटनेनंतर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची तपासणी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र तपासात नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनेनंतर मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आगीत नेमके किती नुकसान झाले आणि गॅस गळतीचे मूळ कारण काय होते, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.