
Junnar Court Verdict Life Imprisonment, Otur Minor Assault Case,
Junnar crime News : समाजाला काळिमा फासणाऱ्या एका घटनेत, स्वतःच्याच नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार यांनी आरोपी राजेश रामदास नवले याला दोषी ठरवत जन्मठेप (सक्त मजुरी) आणि दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ डिसेंबर २०२० रोजी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील पीडित नऊ वर्षांची मुलगी शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणासाठी घरी आली होती. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी बापाने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि मुलीला बेदम मारहाण करत तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या घटनेची माहिती मुलीच्या आईला मिळताच त्यांनी तातडीने ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. एच. कांबळे यांनी तपास स्वतःकडे घेत आरोपीला तातडीने अटक केली. तपासी पथकाने बारकाईने पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जुन्नर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत जन्मठेपेची (सक्त मजुरी) शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच, भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ अंतर्गत एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जी. के. खोडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, कोर्ट पैरवी अधिकारी संतोष घोळवे, मनीषा ताम्हाणे, पूजा औटी तसेच तपास अधिकारी परशुराम कांबळे आणि देविदास खेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. “समाजात अशा विकृत प्रवृत्तींना थारा मिळू नये, यासाठी न्यायालयाने दिलेला हा निकाल पथदर्शक ठरेल,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.