
88 कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगम हे कराडचे पवित्र व निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. येथे दारूच्या बाटल्या व व्यसनी लोकांचा वावर दिसणे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. यामुळे नद्यांचे पावित्र्य आणि शहराची प्रतिमा दोन्ही बाधित होत आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून स्वच्छता राबवून व कडक नियंत्रण ठेवावे. तसेच नागरिकांनीही जबाबदारीने वागून या पवित्र स्थळाचे सौंदर्य जपावे. – प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते व दक्ष नागरिक, कराड
केवळ पर्यटनस्थळ नाही तर कराडच्या अस्मितेचे प्रतीक
राज्यभरातून हजारो लोक ज्या ठिकाणी आदराने नतमस्तक होण्यासाठी येतात, त्या स्मृतीस्थळालगत सुरू असलेले हे प्रकार कराडच्या सांस्कृतिक ओळखीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. स्थानिक नागरिक, पर्यटक आणि भाविक यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही यामुळे ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलीस, नगरपालिका आणि लोकप्रतिनिधीनी एकत्रितपणे तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. प्रीतिसंगम हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर कराडच्या अस्मितेचे प्रतीक आहे. या ठिकाणाची घसरती प्रतिमा रोखायची असेल, तर प्रशासनाने तात्काळ आणि ठोस कारवाई करणे हाच एकमेव फ्याय आहे.
प्रीतिसंगम ‘कॅमेऱ्यांच्य नजरकैदेत’ आणा!
प्रीतिसंगम बागेत काही प्रमाणात सीसीटीव्ही यंत्रणा असली, तरी नदीपात्र आणि संरक्षण भिंतीलगतचा विस्तीर्ण भाग पूर्णपणे दुर्लक्षित आहे. जुना कोयना पूल ते नवीन कृष्णा पुलापर्यंतच्या संपूर्ण परिसरात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक बनले आहे. रिअल टाइम मॉनिटरिंगसह नियंत्रण कक्ष उभारल्यास केवळ नशेखोरांवरच नव्हे, तर एकूणच गुन्हेगारी प्रवृतीवर मोठा आळा बसू शकतो.
‘भरारी पथके ‘च ठरतील रामबाण उपाय
सध्या सुरू असलेली पारंपरिक गस्त अपुरी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीसांनी नव्या पद्धतीने कारवाई करणे गरजेचे आहे. साध्या वेशातील पोलीस, दुचाकीवरून अचानक धाड, आणि अनियमित वेळ या ‘स्ट्रॅटेजी’चा अवलंब केल्यास टवाळखोरांना चकवा देणे शक्य होईल. यासोबतच पकडलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांची नोंद पोलीस रेकॉर्डवर करणे गरजेचे आहे. अन्यथा ‘ओपन बार’ संस्कृतीवर आळा बसणे कठीणच ठरेल.