
सावन वैश्य
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोपरखैरणे परिसरातील विविध कायदा व सुव्यवस्थेच्या समस्यांचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीचे दहा ते पंधरा दिवस परिसरातील नागरिक, व्यापारी व स्थानिक प्रतिनिधींकडून विविध समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
चिमुरडीवर अत्याचार करून खून; आरोपीला फाशीची शिक्षा; जत तालुक्यातील करजगी प्रकरणाचा दीड वर्षांत निकाल
देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रथम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार, बजींगा क्लब, तसेच जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी धडक कारवाई करून अनेकांवर गुन्हे दाखल केले. या कारवायांमुळे परिसरातील अवैध धंद्यांवर मोठा आळा बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आता ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कोपरखैरणे पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार, पोलीस उपआयुक्त विजय खरात व सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी शाळा व महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरातील पानटपऱ्या व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर विशेष कारवाई सुरू केली.
या मोहिमेत अँटी नार्कोटिक्स स्कॉड, गुन्हे शोध पथक व पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत १० गुन्हे दाखल केले असून ₹१९,९६२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने शाळा-महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरातील पानटपऱ्याही हटविण्यात आल्या.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी व्यापारी व नागरिकांना आवाहन करत शाळा-महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात सिगारेट, तंबाखू, गुटखा, बीडी, ई-सिगारेट अथवा इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे सांगितले. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायदेशीर कारवाईही पुढे सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या या सातत्यपूर्ण कारवायांमुळे अवैध धंद्यांवर नियंत्रण येण्यास मदत होत असून परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ठोस पावले उचलल्याचे चित्र दिसून येत आहे.