'तुला लय मस्ती आली का?' असे म्हणत अकलूजमध्ये तरूणाला बेदम मारहाण
अकलुज : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात अकलूज येथे किरकोळ कारणावरून एकावर हल्ला करण्यात आला. ‘तुला लय मस्ती आली आहे काय? तू मागच्यावेळी वाचलास, आता तुला सोडणार नाही’, असे म्हणून तिघांनी एकावर हल्ला केला.
विष्णू सदाशिव घाडगे (रा. कोंडबावी, ता. माळशिरस) यांना हाताने व दगडांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद स्वतः विष्णू घाडगे यांनी अकलूज पोलिसांमध्ये दिली आहे. याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (दि.4) दुपारी अडीचच्या सुमारास विष्णू घाडगे हे त्यांचा मित्र माऊली सुळ (रा.मोरोची, ता. माळशिरस) असे त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतून महर्षी चौकातून गिरीराज पान शॉपसमोर गाडी पार्किग केली. गाडीतून दोघे खाली उतरुन चहा पिण्यासाठी चालले असतानाच त्यांच्या गाडीच्या पाठीमागे एक स्विफ्ट डिझायर गाडी येऊन उभी राहिली.
तेव्हा सदर गाडीतून सागर धुमाळ रा. (नऊचारी) बागेचीवाडी, चिरंजीव दत्तात्रय वाघमारे (रा. कोंडबावी, भैया डांगे रा. (वाघवस्ती) बागेचीवाडी हे उतरले. त्यावेळी सदर गाडीत आणखी दोघे संतोष दत्तात्रय वाघमारे (रा. कोंडबावी) व उमेश धुमाळ (रा.नऊचारी) बागेचीवाडी हे बसलेले होते. त्यानंतर सागर धुमाळ, चिरंजीव वाघमारे, भैया डांगे यांनी ‘विष्णू, तुला लय मस्ती आली आहे काय? तु मागच्यावेळी वाचलास, आता तुला सोडणार नाही, असे म्हणून तिघांनी विष्णू यांना हाताने व दगडांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे.