"हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली प्रॅापर्टी पेटवून द्या...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी कलाकारांची पोस्ट चर्चेत
पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही एकच चर्चा सुरु आहे. वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोपी तिच्या पालकांनी केला होता. त्यातच आता शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, वैष्णवी यांच्या शरीरावर अनेेक गंभीर जखमा दिसून आल्या.
वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हगवणे कुटुंबावर कारवाईचा फार्स आवळला जात असून, पोलिसांनी बुधवारी हुंड्यात दिलेली फॉर्च्यूनर कार आणि अॅक्टिव्हा गाडी जप्त केली आहे. पोलिसांनी मुळशीतील घरी जाऊन कारवाई केली. वैष्णवीला नेमका काय जाच झाला हे तिने एका मैत्रिणीकडे सांगितले होते, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, तिने सासरच्यांनी जाच केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आई-वडिलांना विरोध करुन शशांकसोबत प्रेम विवाह केला, ही माझी आयुष्यातील मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरच मी घटस्फोट घेणार आहे, असे वैष्णवीने मैत्रिणीसोबत व्हॉट्सअॅपवर बोलताना सांगितले होते.
शवविच्छेदन अहवाल समोर
वैष्णवी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाले. या अहवालानुसार, तिच्या शरीरावर हात, पाय, मांडी आणि हनुवटीसह अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आढळले आहेत. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वैष्णवीला हुंड्यात काय दिले?
५१ तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, फॉर्च्यूनर गाडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती, नुकताच दीड लाखांचा मोबाईल, माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी ५० हजार ते १ लाख रुपये. मात्र, जमीन खरेदीसाठी २ कोटींची मागणी केली गेली. ते न दिल्याने छळ आणखी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.