लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य
ठाणे : एका 32 वर्षीय विवाहितेने पोटच्या तीन मुलींसह राहत्या घरात आत्महत्या केल्याची ही घटना भिवंडी शहरातील फेणे गावात घडली. एक मजली चाळीच्या खोलीत ही घटना घडली असून, खळबळजनक बाब म्हणजे आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळली आहे.
पुनिता लालजी भारती (वय 32) त्यांच्या मुली नंदिनी (वय 12) नेहा (वय 7) आणि अनु (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालजी बनवारीलाल भारती हे पत्नी आणि तीन मुलींसह फेणे गाव येथील एका चाळीतील पहिल्या मजल्याच्या खोलीत राहात होते.
लालजी भारती हे यंत्रमाग कामगार असून, ते शुक्रवारी रात्रपाळीवर गेले होते. तर पत्नी पुनिता मुली नंदिनी, नेहा आणि अनु या मायलेकी घरीच होत्या. त्यातच लालजी रात्रपाळी करून सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पतीने आत डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हतबल झालेल्या लालजींनी टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये चारही मृतदेह आढळून आले.
सुसाईड नोट सापडली
मृतदेहाजवळ पुनिता भारती हिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. मात्र, यामध्ये आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस आता या आत्महत्येच्या मागचे कारण शोधत आहेत.