अश्लील चाळे करीत बालिकेचा विनयभंग
शेगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच कपडे प्रेस करण्याच्या दुकानात बोलावून बालिकेशी अश्लील चाळे करत 50 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला. ही संतापजनक घटना सोनाळा येथील भरवस्तीत घडली. यातील आरोपीला रंगेहात पकडून संताप अनावर झालेल्या नागरिकांनी चांगलाच प्रसाद दिला.
याप्रकरणी सोनाळा पोलिस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. रमेश नारायण लहकार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाळा गावातील एका 50 वर्षीय व्यक्तीने दुपारच्या सुमारास 12 वर्षीय बालिकेला भरवस्तीतील दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. यापूर्वीही सदर आरोपीने नको ते अश्लील कृत्य पीडितेसोबत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली. याप्रकरणी आरोपी गजानन नामक आरोपीला दोषी ठरवून दंडासह मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी शनिवारी (दि.3) दिला. संबंधित प्रकरणातील आरोपी गजानन याला विविध कलमांतर्गत 3 वर्षांचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावली.