
उत्तराखंडचा २२ वर्षीय तरुण पुण्यात शिक्षणासाठी आला होता; मित्रांसोबत फिरायला गेला अन् परतलाच नाही
पुणे : विकेंडची सुट्टी… मित्रांसोबत फिरण्याचा प्लॅन… निसर्गरम्य ताम्हिणी घाट आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सगळे मित्र मुळशीला पोहोचले. मात्र, काही वेळातच या आनंदावर विरजण पडले. मिल्कीबार धबधब्याच्या जलकुंडात पोहण्यासाठी उतरलेला २२ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला. शोधमोहीम राबवल्यानंतर अखेर कुंडाच्या तब्बल २५ ते ३० फूट खोलीवर त्याचा मृतदेह आढळून आला.
आयुष शिवसिंग नेगी (वय २२, रा. हृषीकेश, उत्तराखंड) असे मृत तरुणाचे नाव आहे. आयुष सध्या मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राहत होता. तो पुण्यातील पीआयबीएम कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी विकेंडची सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसोबत ताम्हिणी घाटातील मिल्कीबार धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. मिल्कीबार धबधब्याचे पाणी ज्या जलकुंडात पडते, त्या कुंडात आयुष पोहण्यासाठी उतरला. सुरुवातीला तो मित्रांसोबत पाण्यात होता. मात्र, पोहत असतानाच अचानक तो दिसेनासा झाला. काही वेळ शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने मित्रांनी घटनेची माहिती संबंधित पोलिसांना दिली.
हेही वाचा: Accident News: पैठणमध्ये एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीसह तिघांचा दुर्दैवी अंत
घटनेची माहिती मिळताच पौड आणि रायगड जिल्ह्यातील संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बेपत्ता आयुषचा शोध घेण्यासाठी शोध पथकाला पाचारण करण्यात आले. जलकुंडाची खोली आणि पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन शोधमोहीम राबवण्यात आली.
शोधमोहीम सुरू असताना अखेर आयुषचा मृतदेह जलकुंडाच्या तब्बल २५ ते ३० फूट खोलीवर आढळून आला. पथकाने मृतदेह बाहेर काढला. आयुषचा मृतदेह पाहून त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनाही मोठा धक्का बसला. विकेंडची सहल क्षणात दुःखद घटनेत बदलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धबधबे, जलकुंड आणि धरण परिसरात पाण्याची खोली, प्रवाह आणि तळाचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. विशेषतः पावसाळ्यानंतरही अनेक ठिकाणी जलकुंडांमध्ये पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने पर्यटकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.