सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पैठण : दुचाकीवरून तिघे जण निघाले होते… मात्र काही क्षणांतच एसटी बसने मागून जोरदार धडक दिली आणि तिघांचाही जीव गेला. पैठण शहरातील एका कापड दुकानासमोर झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिचे वडील आणि आणखी एका नातेवाइकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांमध्ये कृष्णा अशोक गायकवाड (वय २५), त्यांची पाच वर्षांची मुलगी छकुली कृष्णा गायकवाड आणि अशोक गणेश भालेराव यांचा समावेश आहे. कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे दोघे सख्खे साडू होते. दोघेही छकुलीसह दुचाकीवरून पैठण येथून आगरनांदरकडे निघाले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोनची एसटी बस (एमएच ०६, बीएल ४३६९) पैठण शहरातून मार्गस्थ होत होती. शहरातील एका कापड दुकानासमोर बसने त्यांच्या दुचाकीला (एमएच २०, जीए २९७९) पाठीमागून जोरदार धडक दिली.
एसटी बसची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे परिसरात काही काळ गर्दी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिघांचे मृतदेह पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे मृतांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेनंतर पैठण पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी बस ताब्यात घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले आणि अपघाताच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कृष्णा गायकवाड आणि त्यांची अवघी पाच वर्षांची मुलगी छकुली यांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णा गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर अशोक भालेराव यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.






